मुंबईत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. ठाकरे बंधू एकत्रित दिसले. तरी राज ठाकरे या बाबत कमालीची सावधानता बाळगताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ‘सरकार आणि सरकारची माणसे यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे. काही जण मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असं विधान पत्रकारांंशी बोलताना संजय राऊतांनी केल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.
युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी या युतीबाबत अजूनही संभ्रम कायम ठेवला आहे. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले असून युतीच्या चर्चा करण्याआधी मला विचाराव तसेच त्याशिवाय कोणीही काही बोलू नये अशा सुचना दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे युतीबाबत राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंसोबत युतीची भूमिका पाहायला मिळाली. हे त्यांच्या भाषणातून देखील जाणवत होत. त्यांनी भाषणादरम्यान म्हटलं होत की,”एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत” त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केले असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तर दुसरीकेडे राज ठाकरे आपल्या भाषणात मराठी भाषेचा मुद्दा धरुन ठेवला होता. त्यांच्याकडून युतीबाबत कोणतही स्पष्ट वक्तव्य ऐकायला मिळालं नाही.
संजय राऊतांच्या मनात युतीबाबत शंका?
“राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे महत्वाचे होते. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यामुळे काही जणांनी धसका घेतला आहे. ते दोन्ही नेते एकत्र कसे येतात, हे पाहू, असे म्हटले जात आहे. सरकार आणि सरकारची माणसे यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे. काही जण मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे विधान संजय राऊतांनी केल्याने युतीबाबत अनेक संभ्रम असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.