नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईतच होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या तपासात त्यानं ही धक्कादायक कबुली दिली आहे. पाकिस्तानी सैन्याचा एजंट असल्याचंही राणानं या चौकशीत मान्य केलंय.
मुंबई बॉम्बस्फोटातील दुसरा प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याच्यासोबत पाकिस्तानात लष्कर ए तोयबाच्या तळावर ट्रेनिंग सेशन केले होते, असंही राणानं सांगितलंय. लष्कर ए तोयबा गुप्तहेर यंत्रणेप्रमाणे कार्यरत असल्याची माहिती तहव्वूर राणानं एनआयएच्या तपासात दिली आहे.

राणाच्या चौकशीत पाकिस्तानचं पितळ उघड
एनआयएच्या तपासानंतर आता मुंबई पोलीस क्राईम ब्रँच राणाला अटक करुन त्याची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. सध्या दिल्लीत तहव्वूर राणा हा न्यायालयीन कोठडीत असून त्याची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेत शिकागोमध्ये एफबीआयनं राणाला अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी 10 एप्रिल 2025 रोजी त्याला भारतात आणण्यात आलं आहे.
मुंबईत उघडलं होतं इमिग्रेशन सेंटर
तहव्वूर राणानं चौकशीत सांगितलं की, मुंबईत त्यानं त्याच्या कंपनीचं इमिग्रेशन सेंटर उघडलं होतं. ही त्याचीच कल्पना होती. मुंबई हल्ल्याच्या तयारीसाठी जागा आणि सोयी उपलब्ध करण्यासाठी हे करण्यात आलं होतं. हल्ल्यासाठी करण्यात आलेल्या खर्चांना व्यापाराच्या खर्चात दाखवण्यात आलं. छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या ठिकाणांची त्यानं स्वत: जाऊन रेकी केली होती हेही त्यानं मान्य केलंय.
आयएसआयशी संबंध आणि सौदी अरबशी संबंध
26-11 चा हल्ला हा पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआयसोबत मिळून केला होता, अशी धक्कादायक माहिती राणानं त्याच्या जबाबातत दिली आहे. खाडी युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यानं त्याला सौदी अरबला पाठवलं होतं अशीही माहिती त्यानं दिलीय.
पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर होता राणा
64 वर्षांचा तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. राणा पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर 1997 साली तो कॅनडात गेला. इमिग्रेशन सर्व्हिस देण्याच्या उद्योगपतीच्या रुपानं त्यानं नवी इनिंग सुरु केली होती. कॅनडासाह अमेरिका, शिकागो या ठिकाणी त्यानं कन्सलटन्सी फर्म उघडल्या होत्या. त्याला सात भाषा अवगत असून त्यानं अनेकदा कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लड देशात प्रवास केल्याचंही समोर आलंय.
डेव्हिड हेडलीचा मित्र
मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीचा तहव्वूर राणा हा मित्र आहे. मुंबईवरील हल्ला घडवून आणण्यात राणानं हेडलीला मदत केली. हेडली लष्करशी संबंधित असल्याची पूर्ण कल्पना राणाला होती. हेडलीला मदत करुन आणि आर्थिक सहकार्य करुन दहशतवादी संस्था आणि दहशतवाद्यांना राणा मदत करीत होता.