रशियातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रशियात अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येतंय. अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घातल्यास सरकार त्यांना १ लाख रुपये देणार आहे. 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलींना मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकार प्रयत्न करतंय. तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल पण रशियात हे वास्तवात घडताना दिसतंय. रशियातील कमी होत चाललेली लोकसंख्या आणि वयस्करांची वाढती संख्या ही समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून ही घाई करण्यात येतेय.
अल्पवयीन मातांसाठी योजना
१. अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन
२. मुलांच्या संगोपनासाठी रशिया सरकार देणार 1 लाख रुपये
३. रशियात मार्च 2025 पासून 10 भागात योजना
४. पूर्वी 18 वर्षांवरील तरुणी-महिलांसाठी होती योजना
५. आता जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी अल्पवयीन मुलींनाही प्रोत्साहन
६. 2023 साली रशियात प्रति महिला सरासरी जन्मदर 1.41
७. लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी प्रति महिला सरासरी जन्मदर 2.05 असण्याची गरज
८. जगात रशिया लोकसंख्येत 9 व्या स्थानी, मात्र आता लोकसंख्या कमी होण्याची भीती

शाळा, कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना मुलांना जन्म घालण्यासाठी पैसे देण्याचा रशियन सरकारचा हा निर्णय वादग्रस्त आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाशी या योजनेचा संबंध असल्याचं सांगण्यात येतंय. जास्त लोकसंख्या असलेला देश मोठं सैन्य उभारु शकतो, असं विधान अनेकदा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केलेलं आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियातील सुमारे अडीच लाख सैनिक मारले गेले आहेत. तसंच युद्धामुळे हजारो सुशिक्षित तरुण-तरुणींनी रशिया सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. अशा स्थितील लोकसंख्या वाढवण्याला प्राधान्य देत अल्पवयीन मुलींनाही मुलांना जन्म घालण्यासाठी प्रोत्साहित केलं जातंय.
करिअर करणाऱ्या महिलांनी मुलांचा विचार करावा यासाठी रशियात प्रयत्न होत आहेत. लग्न करु नका असा सल्ला देणाऱ्या किंवा केवळ करिअरसाठी प्रेरित करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि जाहिरातींवर कारवाईचा कायदा करण्यात आली आहे. घसरता जन्मदर रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे गर्भपात करण्यावर कठोर बंदी घालण्यात आली आहे. मुलींनी आणि महिलांनी लग्न करावं, मुलं जन्माला घालावीत यासाठी रशिया सरकारकडून प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे मुलं जन्माला घालण्यासाठी आग्रह धरणारा रशिया हा एकमेव देश नाही. इतरही देशात मुलं जन्माला घालण्यासाठी असंच आमिष दाखवण्यात येतंय.
कोणत्या देशांत काय आमिष?
१. अमेरिका – ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात प्रत्येक जन्माला आलेल्या मुलासाठी 5 हजार डॉलर्सचा प्रस्ताव
२. हंगेरी- 3 पेक्षा जास्त मुलं असलेल्या कुटुंबाला करातून सूट आणि कमी व्याजावर कर्ज
३. रशिया- 10 मुलं जन्माला घालणाऱ्या महिलेला मदरहूड मेडल, 10 लाखांचं बक्षीस
४. इटली- मुलाच्या जन्मानंतर 1 लाख रुपयांची रोख मदत
५. पोलंड- 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या कुटुंबाला प्रत्येक मुलासाठी महिन्याला 11 हजारांची मदत
६. सिंगापूर- तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 6 लाख रुपयांची मदत
मात्र पैशांचं लालूच दाखवूनही अनेक देशांत जन्मदर वाढताना दिसत नाहीये. मुलाला जन्म घालण्याचा निर्णय आई-वडिलांचा आहे. त्यात महागाई, करिअर, जबाबदारी या सगळ्यांचा विचार करुन निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे अशा योजना लागू करुनही लोकसंख्येत वाढ होताना मात्र दिसत नाहीये