अमेरिकेतील टेक्सासमध्ये महापूर; 78 जणांनी गमावला जीव…काहीजण बेपत्ता

अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. 78 जणांचा मृत्यू झाला असून 41 नागरिक बेपत्ता आहेत.

अमेरिकेतील टेक्सास राज्यात महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून ७८ जणांनी आपला जीव गमावला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला, रस्ते बंद झाले आणि अनेक घरे पाण्यात बुडाली. हजारो नागरिकांना आपले घर सोडावे लागले असून आपत्कालीन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक जनतेचे हाल सुरू आहेत. सरकार आणि बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अचानक मोठा पाऊस, महापूर आणि हाहाकार

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शुक्रवारी पहाटे अचानक आलेल्या महापुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे, तर 41 नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत केर काउंटीतील ग्वाडालूप नदीच्या काठावर वसलेल्या ‘कॅम्प मिस्टिक’ या ख्रिश्चन मुलींच्या समर कॅम्पला मोठा फटका बसला आहे. सध्या पूर ओसरत असला तरी चिखल, ढिगारे, आणि विषारी सापांमुळे मदतकार्यात अडथळा येतो आहे. काही मृतदेह कॅम्पपासून आठ मैलांपर्यंतच्या परिसरात सापडले आहेत. परिसरातील अनेक घरे, रस्ते, झाडं, विद्युत वाहिन्या यांचे मोठे नुकसान झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेवर व्यक्त केले दु:ख

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या आपत्तीवर दु:ख व्यक्त करत केर काउंटीला ‘डिझास्टर क्षेत्र’ घोषित केलं असून, फेडरल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (FEMA) सक्रिय करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी, स्वयंसेवी संस्था, आणि अन्य नागरिक अन्न, कपडे, निवारा देत मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिका आणि जगभरातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या आपत्तीने टेक्सासमधील जनजीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण देशातून मदतीचे आवाहन केले जात आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन आपत्कालीन सेवांकडून करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News