शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने बच्चू कडू आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या पापळ गावापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. 7 दिवसाची ही यात्रा असणार आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
7 दिवसांची ७/१२ कोरा यात्रा
बच्चू कडूंची ही यात्रा 7 दिवासांची असणार आहे. मध्यंतरी कडून अन्नत्याग आंदोलन केले. मात्र, त्यानंतरही सरकारचा या मागणीची पूर्तता करण्यासाठी म्हणावा असा प्रतिसाद दिसला नाही. 138 किमीचे पायी अंतर पार करीत उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होणार आहे.

सातबारा कोरा करा -कडू
शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला आहे. सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्र व्हा, मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक व्हा असे आवाहन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
राज्यभरातील शेतकरी सहभागी
पदयात्रेत राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची एकी दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावागावात प्रतिकात्मक स्वरुपात शेतकरी सात-बारा बच्चू कडू यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत आणि आंदोलनास पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र देणार आहेत. पुढील दिवसांत या यात्रेचा प्रतिसाद आणखी वाढू शकतो.
बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेतकरी, विधवा, दिव्यांग आणि कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही पदयात्रा होती. विविध भागांतून शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आणि आंदोलनास सामाजिक व राजकीय साथही मिळाली.