राज्याच्या पश्चिम आणि उत्तर भागात पावसाचा जोर आता वाढताना दिसत आहे. नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील तेरा धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे आता ओसंडून वाहत आहेत आणि अनेक धरणांची पाणीपातळी वाढली आहे. विसर्ग सुरू झाल्याने नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणांतून मोठा विसर्ग सुरू
आजमितीस नाशिक जिल्ह्यातील तेवीस धरण प्रकल्पांपैकी सात धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर तेरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजचा नाशिक जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा जवळपास एकाहत्तर टक्के झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये तो अवघा अकरा पूर्णांक बासष्ठ टक्के होता. म्हणजेच, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साठ टक्के धरणे अधिक भरलेली आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यातील तेवीसपैकी अनेक धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत, तर सात धरणे शंभर टक्के भरलेली आहेत.

गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील जवळपास एकसष्ठ टक्के झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून पाच हजार शंभर शहाऐंशी क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे. अकरा वाजेनंतर विसर्गात एक हजार क्युसेक वेगाने वाढ केली जाईल आणि साधारण सहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रामध्ये सोडला जाईल. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे.
गंगापूर धरणाचे एकूण नऊ दरवाजे असून, त्यापैकी आठ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दारणा, मुकणे, पालखेड यांसारख्या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत साधारण सतरा हजार एमसीएफटी पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.