खासगी सावकारी काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही. आता अशीच एक बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकी ही घटना काय? शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यापाऱ्याच्या खिशात 6 पानांची चिठ्ठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे समजते. त्यामुळे ही आत्महत्या खासगी सावकाराच्या जाचातून झाल्याचे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड येथील रामा फटाले नावाच्या व्यापाऱ्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. पेठ बीडमधील पुलाजवळ त्यांचे कपड्याचे दुकान होते आणि ते चालवण्यासाठी त्यांनी हे कर्ज घेतले होते. कर्जापोटी त्यांनी सावकाराला काही चेकही दिले होते. राम फटाले यांनी कर्ज फेडल्यानंतर, आपले चेक परत मागितले. मात्र, खासगी सावकाराने आणि त्याच्या पत्नीने चेक परत देण्यास नकार दिला. उलट, त्यांनी फटाले यांना धमकावले आणि पैशांसाठी सातत्याने तगादा लावला, आणि फटाले संबंधितांच्या जाचाला कंटाळले होते.

त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सहा पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी खासगी सावकाराचे नाव, त्याच्या पत्नीचे नाव आणि इतर काही व्यक्तींचा उल्लेख केल्याचे कळते.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणात सहा पानी चिठ्ठी आढळून आल्यानंतर, पोलिसांना आणखी कुठल्या पुराव्याची गरज आहे, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. सामाजिक कार्याचा आव आणत खासगी सावकारकी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करून, मृत व्यापाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून देखील या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. एका व्यापाऱ्याने आपले जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.