भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने 2025 च्या आयपीएल स्पर्धेची अनिश्चित काळासाठी स्थगिती जाहीर केली आहे. हे पाऊल भारत-पाकिस्तान सीमा वादामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे उचलले गेले आहे. स्पर्धा 58व्या सामन्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या भ्याड हल्ल्याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर बीसीसीआयने हा निर्णय जाहीर केला.
आयपीएलचं पुढील नियोजन काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवावा लागणार आहे. अजूनही आयपीएलच्या 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. हे 17 सामने कसे आणि कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. याच वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेचं आयोजनही केलं जाणार आहे. त्यामुळे मैदानं आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल. हे पाहता बीसीसीआयची मोठी कसरत होणार आहे.

आतापर्यंत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आऊट झाले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्तित आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 7 संघ असून त्यांच्यात टॉप 4 साठी लढत सुरु आहे. तसेच आयपीएलचे सामने पुन्हा कधी सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल स्थगित
यापूर्वी 2021 मध्ये कोरोना काळात आयपीएल स्पर्धा स्थगित केली होती. कोरोना संकटात आयपीएल 2021 स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात आली होती. 4 मे 2021 रोजी आयपीएल स्पर्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थगित केली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला होता. पहिल्या टप्प्यात 29 सामने, तर दुसऱ्या टप्प्यात 31 सामने झाले होते. अशा प्रकारचे नियोजन यंदा केले जाणे शक्य आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
चाहते आणि खेळाडूंत निराशा
अनिश्चित काळासाठी स्थगिती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे, कारण IPL ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा मानली जाते. आयपीएलच्या स्थगितीमुळे खेळाडू, प्रशिक्षक, आणि इतर संबंधित व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच, स्पर्धेच्या आर्थिक बाबींबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या निर्णयामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा आहे.
IPL 2025 suspended with immediate effect, in view of India-Pakistan tension: BCCI sources pic.twitter.com/lY556tTAkc
— ANI (@ANI) May 9, 2025