राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी, आजपासून अंमलबजावणी

या शासन निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन, मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक तसेच यामध्ये प्रतवारी, आवेस्टन, साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.

Nitesh Rane – राज्य सरकारने मत्स्य व्यवसायासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मत्स्यसंवर्धक, राज्यातील मच्छीमार यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. हा निर्णय आज राज्य सरकारने जारी केला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयामुळं मच्छीमार व्यवसायिकांना मोठा आर्थिक पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जाते.

आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे राज्यातील मच्छीमार व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन निर्णय आज तातडीने जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मत्स्य व्यवसायाला सुविधा…

दरम्यान, बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभही मत्स्य क्षेत्रात देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी दराने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड याचा लाभ दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेबाबत ऊर्जा विभागातर्फे देण्यात येणारे लाभ यापुढे मत्स्य व्यवसायिकांना देण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळं मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील मत्स्य उत्पादक त्याचबरोबर मत्स्य व्यवसायिक आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कामगार क्षेत्राला या शासन निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

रोजगार निर्मितीही होण्यास मदत…

या शासन निर्णयात मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य व्यवसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज, मत्स्य बोटुकली संवर्धक, मत्स्य व्यवस्थापन अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित संज्ञांच्या प्रथमच सुस्पष्ट व्याख्या निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीबरोबरच कृषी संलग्न क्षेत्रांवर जसे की पशुपालन, मत्स्यपालन, फळ फळावर, भाजीपाला या क्षेत्रांवर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे हे योगदान लक्षात घेऊन मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होणार असून, स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगार निर्मितीही होण्यास मदत होणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News