Pratap Sarnaik : लालपरी अर्थात एसटी ही आजही गाव खेड्यातील लोकांच्या दळणवळणाचे मुख्य साधन आहे. लालपरी ही ग्रामाण भागातील लोकांची जीवनवाहिनी मानली जाते. दरम्यान, त्याच एसटीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. अशी माहिती परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांनी दिली.
डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही. पण भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर चालतील अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरण पूरक इंधनाबाबत बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

इंधनावरील खर्चात बचत होईल…
दरम्यान, भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सी.एन.जी. आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरण पूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लीटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४% खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात.
एल.एन.जी. इंधनावर २०% सूट…
दुसरीकडे राज्याभरात ९० ठिकाणी एल.एन.जी. चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारे सी.एन.जी. चे २० पंप उभारले जात आहेत. एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एल.एन.जी.इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २०% कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार असून या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्याकडून मागविण्यात आले आहेत.