ऑपरेशन सिंदूरमध्ये आतापर्यंत झालेल्या कारवाईत काय काय झालं यातील घडामोडी देश आणि जगासमोर ठेवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सायंकाळी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह, आर्मीच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषद संबोधित केली. यादरम्यान कर्नल सोफिया म्हणाल्या, पाकिस्तान बेजबाबदार पद्धतीने वागत आहे. पाकिस्तानचं विमानतळ अद्यापही नागरी विमानांसाठी बंद करण्यात आलेलं नाही. ते म्हणाले, पाकिस्तान ही उड्डाणं ढाल म्हणून वापरत आहे.
कर्नल सोफिया कुरैशींनी काय सांगितलं?
या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालय, सैन्य आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी ८-९ मेच्या रात्री झालेल्या कारवाईची माहिती दिली. कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितलं की, सीमेवरील तणावानंतर भारताने सीमेजवळ आपल्या हवाई भागातील नागरी उड्डाणं बंद केली आहेत. ते म्हणाले, भारतातील काही निवडक विमानतळं बंद करण्यात आली आहेत. मात्र पाकिस्तानकडून बेजबाबदार कृत्य केलं जात आहे. ७ मे २०२५ च्या रात्री अकारण आणि अयशस्वी ड्रोन आणि मिसाइल हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानने आपल्याकडील विमानतळं बंद केली नाहीत. पाकिस्तान आपली नागरी विमानं ढाल म्हणून वापरत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ उड्डाणं घेणं नागरिकांसाठी सुरक्षित नाही.

त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या पंजाब सेक्टरमध्ये हाय एअर डिफेन्स अलर्टची स्थिती आहे. त्यांनी फ्लाइट रडार २४ नावाच्या एका अॅपमधील डेटाच्या आधारावर सांगितलं की, भारतीय विमानतळं बंद केल्यामुळे नागरिकांवरील धोका टळला आहे. मात्र कराची आणि लाहोर मार्गावर एअरलाइन्स उड्डाणं भरत आहेत. त्यांनी एक एअरबस ३२० च्या उड्डाणाचा डेटा दिला आहे. या विमानाने सायंकाळी ५.५० मिनिटांनी उड्डाण केलं होतं. हे विमान दमणवरुन निघालं होतं आणि रात्री ९.१० मिनिटांनी लाहोरमध्ये उतरलं होतं. ते पुढे म्हणाले, भारताच्या वायुसैन्याने आपली प्रतिक्रियामध्ये संयम ठेवलं. याप्रकारे भारताने आंतरराष्ट्रीय नागरिक विमानसेवेची सुरक्षा निश्चित केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…
भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की मेड ड्रोनचा पाककडून वापर करण्यात आला होता. भारताच्या 36 ठिकाणांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पुंछ तसंच इतर ठिकाणी धार्मिक स्थळांवर (गुरुद्वारे) पाकिस्तानकडून हल्ले परतवून लावण्यात आले. पाकिस्तानकडून सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलं असून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 300-400 ड्रोनची घुसखोरी करण्यात आली होती. या सर्वच्या सर्व ड्रोन निकामी करण्यात आले. पाकिस्तानकडून नागरी विमानसेवेचा ढाल म्हणून वापर केला जात आहे. पाकिस्ताननं कराची ते लाहौर दरम्यान नागरी विमानसेवा सुरु ठेवली. कर्तारपूर कॉरीडोर सध्या तरी बंद असून लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.