जयंत पाटलांचा राजीनामा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे शशिकांत शिंदेंच्या हातात?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वाच्या पातळीवर मोठा बदल झालाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वाच्या पातळीवर मोठा बदल झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार आहे. 15 जुलै रोजी ते औपचारिकपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निष्ठावंत नेते मानले जातात.

शशिकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी

जयंत पाटील यांनी आधीच प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करावं, अशी विनंती पक्षाच्या वर्धापन दिनी म्हणजेच 10 जून रोजी केली होती. सात वर्षांच्या कालावधीत पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवून जबाबदारी दिली, परंतु आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता जयंत पाटलांनी थेट प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाच दिला. त्यामुळे आता नवा चेहरा म्हणून शशिकांत शिंदेंना संधी मिळताना दिसत आहे. शशिकांत शिंदेंवर या निमित्ताने मोठी जबाबदारी देखील असणार आहे.

15 जुलैला अधिकृत घोषणा होणार

“पक्षाकडून अजून अधिकृत निर्णय झालेला नाही. पवारसाहेब, सुप्रिया ताई आणि जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मी स्वीकारेन,” असं त्यांनी सांगितलं. 15 जुलै रोजी पक्षाची बैठक असून, त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. “माझं नाव चर्चेत आहे हे तुमच्याकडूनच कळलं, मात्र कोणतंही नाव अधिकृत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार मी जबाबदारीनं काम करीन,” असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले, “आजचा काळ संघर्षाचा आहे. पक्षाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ राहून काम करावं लागेल. जयंत पाटील यांनी केलेल्या कामाची तुलना होणं कठीण आहे. त्यांनी अतिशय जबाबदारीनं पक्षाचं नेतृत्व केलं आहे.”

राजकीय घडामोडी, बेरोजगारीचा प्रश्न, तरुणांचा असंतोष यावर बोलताना शिंदे म्हणाले की, “राजकीय चळवळींमध्ये नव्या नेतृत्वाची गरज आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासनं दिली जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. हे वास्तव जनतेसमोर मांडायला हवं.” अशा शब्दांत ही जबाबादारी मिळाल्यास आपण कसे काम करणार हे शशिकांत शिंदेंनी आधीच स्पष्ट केले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News