वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निमित्ताने गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येने राजकारणात एंट्री केल्याचं स्पष्ट झाले आहे.
यशश्री मुंडेंची राजकारणात एंट्री
यशश्री मुंडे या पेशाने वकील असून, त्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ म्हणून गौरव प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. यशश्री यांचे हे राजकीय लॉन्चिंग कसे असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

17 जागांसाठी निवडणूक; 71 अर्ज
जिल्हा उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. यामध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या 71 असल्याची माहिती समोर येत आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- छाननी प्रक्रिया: 14 जुलै
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 15 जुलै ते 29 जुलै
- चिन्हांचे वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी: 30 जुलै
- मतदानाचा दिवस: 10 ऑगस्ट, सकाळी 8 ते संध्याकाळी 4
- मतमोजणी: 12 ऑगस्ट, सकाळी 8 वाजल्यापासून सुरू
10 ऑगस्टला होणार मतदान
7 ते 11जुलै दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 14 जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप 30 जुलै रोजी होईल. मतदान 10 ऑगस्टला – सकाळी 8 ते संध्या 4 वाजेपर्यंत होणार आहे.12 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल आणि त्यानंतर निकाल लागेल. बीड जिल्हा आणि परळीच्या स्थानिक राजकारणात या बँकेच्या निवडणुकीचे महत्व मोठे असल्याने राजकीय वर्तुळाच्या या निवडणुकीकडे नजरा लागल्या आहेत.