शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गोत्यात येताना दिसत आहेत. आता मंत्री संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शिरसाट यांच्या हातात पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी समोर आणला होता. त्यामध्ये दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. मात्र, त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाले आहेत.
‘राऊतांवर अब्रु नुकसानीचा दावा टाकणार’
या व्हिडिओ प्रकरणावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘मला बदनाम करण्यासाठी हा मोर्फ व्हिडीओ वापरला. मी ठरवलंय की, अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकरबाबत त्यांचे व्हिडीओ पाहा मग तुम्हाला कळेल ते कसे आहेत. माझा तो व्हीडिओ हे माझं चारित्र्यहनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन, ‘ अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे.

“राऊतांना नोटीस पाठवणार आहे. उत्तर दिलं नाही तर फौजदारी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करणार आहे. त्यांना मान नाही, त्यांची लायकी नाही, रोज सकाळी भोंगा सुरुच आहे. महाराष्ट्रात यांची गँग कार्यरत आहे. आता मलाही त्यांच्या सरकारी बंगल्यातील पार्ट्या काढाव्या लागतील. नालयकांनो कुठला तरी व्हिडीओ माझा काढला, तुम्हाला लाज लज्जा वाटते का? तुम्ही नीच पातळी गाठत आहात. हे सगळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहेत,” अशा शब्दांत शिरसाटांनी आपला संताप देखील व्यक्त केल्याचे समोर येत आहे.
खा. संजय राऊतांचा दावा नेमका काय?
संजय राऊतांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर मंत्री शिरसाटांचा एक व्हि़डिओ पोस्ट केला. ज्यामध्ये संजय राऊत म्हणतात की, अथवा दावा करतात की, संजय शिरसाट सिगारेट पित असून त्यांच्या बाजूला असणाऱ्या बॅगमध्ये पैसे आहेत. त्यामुळे याची अनेक ठिकाणी दखल देखील घेतली गेली. दरम्यान, हा व्हिडीओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा पाय रोजच्या रोज खोलात जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध, नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. आता बेडरुममधील पैशांच्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.