आमदार रोहित पवारांच्या मागील संकंटांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात विशेष कोर्टात पूरक आरोपपत्र सादर केले आहे. याआधी या प्रकरणात ईडीने बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या 50 कोटींच्या मालमत्तांवर कारवाई केली होती. तसेच मागील वर्षी रोहित पवार यांची या प्रकरणात चौकशीही झाली होती.
रोहित पवारांच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र
कथित गैरव्यवहार प्रकरणात अलीकडेच पूरक आरोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती ईडीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ईडीच्या चौकशीनुसार, आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो आणि इतर संबंधित कंपन्यांनी संगनमत करून या प्रकरणात संशयास्पद आर्थिक व्यवहार केले असल्याचा संशय आहे. विशेषतः, आर्थिक अडचणीत गेलेल्या साखर कारखान्यांची लिलावात खरेदी करण्यात आली. त्यामध्ये कन्नड एसएसके साखर गिरणी बारामती ॲग्रो प्रा. लि.कडून सुमारे 50 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या व्यवहारासाठी आवश्यक असलेला निधी बारामती ॲग्रोने कुठून उभारला याचा तपास ईडी सध्या करत आहे.

रोहित पवारांच्या अडचणी वाढणार का?
बारामती ॲग्रोने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी हायटेक कंपनीसोबत संगनमत केल्याचा संशय आहे. या संगनमताच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप करून चुकीच्या मार्गाने बोली जिंकण्याचा प्रयत्न झाल्याचे ईडीला वाटते. तसेच, बारामती ॲग्रोने आपली बोली अधिक आकर्षक ठरावी यासाठी हायटेकला कमी रकमेची बोली लावण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांना काही रक्कम हस्तांतरित केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे आगामी काळात आमदार रोहित पवारांच्या अडचणी आणखी वाढतात की काय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.