मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यात आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. कारण, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाण्यातील तब्बल 5285 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. केवळ घरेच नाही तर 77 भूखंड सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी सर्वसामान्यांचे फक्त घर खरेदीचेच नव्हे तर अगदी प्लॉट खरेदीचे स्वप्न देखील साकार होणार आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
5,285 घरे आणि 77 भूखंडांसाठी लॉटरी निघणार
कोकण मंडळातर्फे ठाणे, वसई, कुळगाव-बदलापूर, सिंधुदुर्ग येथील घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 5285 घरे आणि 77 भूखंडांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे परवडणाऱ्या किमतीत असणार आहेत त्यामुळे नागरिकांना स्वस्तात आपल्या हक्काचं घर खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. नागरिकांमधून तसेच इच्छुंकांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

5285 घरांपैकी 20 टक्के सर्वसमावेशक योजनेच्या अंतर्गत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत विक्री योजनेच्या अंतर्गत 1677 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत 50 टक्के परवडणाऱ्या सदनिका अंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच 77 भूखंड सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
सोडत नेमकी कोणत्या तारखेला निघेल?
या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो लाईव्ह कार्यक्रमाने सोमवारी 14 जुलै 2025 रोजी होणार आहे. म्हाडाने महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबियांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार घरे उपलब्ध करून दिली आहेत. म्हाडाने आतापर्यंत लाखो परिवारांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार केलेले आहे. आता वेळ तुमची आहे. म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.