छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह 11 किल्ले आहेत तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीतील समावेशानंतर आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं राज ठाकरेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊ…
निर्णयामुळे किल्ल्यांचे संवर्धन होईल -राज ठाकरे
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी… pic.twitter.com/O8CEuMI1FG
— Raj Thackeray (@RajThackeray) July 12, 2025
नेमके कोणते किल्ले युनेस्कोच्या यादीत?
राज्यातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती. त्यानुसार आता रायगड, राजगड, लोहगड, खांदेरी, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा लष्करी भुप्रदेश म्हणून या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ह्ज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे.