गाझामध्ये उद्भवली भयंकर परिस्थिती; अन्न-पाण्याविना शेकडो नागरिकांचा बळी!

7 जुलै 2025 पर्यंत सुमारे 798 पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत, जे या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे गाझातील स्थिती दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे.

गाझा – इस्रायल संघर्षाची परिणीती आता अनेक लोकांचा प्राण जाण्यामध्ये होताना दिसत आहे. या संघर्षाची तीव्रता वाढत असतानाच, आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक समस्या गाझातील नागरिकांना भेडसावत आहे – ती म्हणजे अन्न आणि पाण्याची टंचाई. या टंचाईमुळे नागरिकांना अक्षरश: जीव गमावावा लागत आहे.

शेकडो नागरिकांना अन्न-पाण्याविना बळी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार कार्यालयाने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 7 जुलै 2025 पर्यंत सुमारे 798 पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत, जे या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. ही मृत्यूची संख्या मुख्यतः अन्न वाटप केंद्रे आणि मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या मार्गांवर नोंदवली गेली आहे. ही केंद्रे गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) या संस्थेमार्फत चालवली जात होती, ज्यांना अमेरिका आणि इस्रायलकडून मदत मिळते. GHF मदतीसाठी खासगी सुरक्षा कंपन्यांचा वापर करत असल्याने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पारंपरिक मदत प्रणालीला बाजूला टाकले जात असल्याची टीका होत आहे.

गाझाला जागतिक मदतीची गरज

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे की ही पद्धत केवळ असुरक्षितच नाही, तर मानवी तटस्थतेच्या आंतरराष्ट्रीय निकषांचाही भंग करते. संघटनेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, मृत्युमध्ये 615 नागरिक मदत केंद्रांच्या आसपास मरण पावले, तर उर्वरित 183 जण मदत काफिल्यांच्या मार्गावर असताना मारले गेले.दरम्यान, GHF कडून असे सांगण्यात आले आहे की त्यांच्या केंद्रांवर अशा कोणत्याही घटनांचा थेट संबंध नाही आणि ते अन्न वाटप सुरळीत पार पाडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात काही शक्तीशाली आंतरराष्ट्रीय समुदाय यामध्ये हस्तक्षेप करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News