गोरखपूर – उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या व्यक्तीला चिडवणं किती महागात पडू शकतं, हे दाखवणारी ही घटना आहे. एका व्यक्तीला जाडा म्हणून चिडवल्यानं नाराज आणि संतापलेल्या या व्यक्तीनं दोन तरुणांना थेट गोळ्या मारल्या आहेत.
यासाठी या दोन तरुणांचा या व्यक्तीनं २० किलोमीटर पाठलागही केला. गोळ्या मारल्यानंतर ही व्यक्ती फरार झाली असून, ज्या तरुणांना गोळ्या मारण्यात आल्या त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमका काय घडला प्रकार?
अनिल चौहान आणि शुभम यादव हे मंझरियात राहणारे तरुण तरकुलहा मंदिरात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघेही घरी परतत होते. 20 किलोमीटर पुढे आल्यानंतर, एका व्यक्तीनं त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबवली आणि दोघांवरही एकाएकी गोळीबार केला. या गोळीबारात शुभम गंभीर जखमी झालेला आहे. तर अनिलच्या हाताला गोळी लागली आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला. गोळीबाराच्या आवाजानं जमलेल्या गर्दीतल्या काही जणांना या दोघांना रुग्णालयात दाखल केलंय.
आरोपीला अटक, सांगितलं हल्ल्याचं कारण
पोलिसांनी गोळीबारानंतर घटनेची दखल घेत तपास सुरु केला. त्यानंतर तपासात अर्जुन चौहान नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. पोलिसांनी बेलघाटात जाऊन अर्जुनला अटक केली. आरोपीच्या चौकशीत हल्ल्याचं कारण ऐकून पोलीसही हैराण झालेत.
आरोपीनं पोलिसांना सांगितलं की तरकुलहा कार्यक्रमात अर्जूनही होता. त्यावेळी अनिल आणि शुभम यांनी जाडेपणावरुन अर्जुनवर विनोद केले होते. या दोघांना अर्जुननं विरोध केला तर इतरांनीही अर्जुनची मस्करी केली होती. या अपमानामुळं अर्जुन व्यथित झाला आणि या दोघांना धडा शिकवण्याचा पण त्यानं केला. कार्यक्रम संपल्यानंतर या दोघांचा पाठलाग करुन त्यानं एका जागी त्यांची गाडी थांबवून त्यांना गोळ्या मारल्या. आता आरोपी अर्जुन तुरुंगात असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.