मुंबई – लोकलला असलेली गर्दी आणि वाहतूक कोंडी ही मुंबईकरांसाठी मोठी समस्या आहे. दररोज 50 ते 60 लाखांहून अधिक मुंबईकर हे शहर ते उपनगर असा प्रवास करतात. यासाठी त्यांना लोकल, मेट्रो, सार्वजनिक बेस्ट सेवा आणि रिक्षा-टॅक्सीसह खासगी वाहनांच्या पर्यायांचा वापर करावा लागतो. मुंबईतील रेल्वेवरील ताण कमी व्हावा, यासाठी महायुती सरकारनं मेट्रोचं काम गतीनं हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं ठरवलंय. मुंबईत प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. यात सुसूत्रता आणण्यासाठी लोकल, मेट्रो आणि बेस्ट बस या तिन्ही पर्यांतून प्रवास करण्यासाठी एकच स्मार्ट कार्ड लवकरच लाँच करण्यात येणार आहे. सामायिक तिकिटं देणाऱ्या स्मार्ट कार्डची चाचणी अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

काय म्हणालेत मुख्यमंत्री?
एकाच तिकिटावर चार सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्यासाठीची प्रणाली विकसित करण्यात येते आहे. या प्रणालीच्या चाचण्या सध्या वेगानं सुरु आहेत. सामायिक तिकिटासाठी एक अॅप विकसित करण्यात येणार आहे. या अॅपवर प्रवाशांपुढे प्रवासाचे पर्याय असणार आहे. वेळ आणि पैशांची बचत करणारे पर्यायही अॅपवर उपलब्ध असतील. त्यानंतर योग्य पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य मुंबईकरांना असणार आहे.
स्मार्ट कार्डचा काय होणार फायदा?
मुंबईकर दैनंदिन प्रवास करत असल्यानं, त्यांच्या प्रवासाची नियमित घडी बसलेली आहे. लोकलनं प्रवास करणारा मुंबईकर मेट्रो आणि बेस्ट बसमधून प्रवास करण्यास फारसा उत्सुक नसण्याची शक्यता आहे. मुंबईत मेट्रो सुरु झाली असली तरी लोकलमधून प्रवास करण्याकडेच आजही अनेकांचा कल आहे. मेट्रो नवी असल्यानं त्याची स्टेशन्सही अजून अनेकांना माहिती नाहीत. अशात स्मार्ट कार्ड योजनेतून प्रवाशांना पैसे आणि वेळ बचतीचा मार्ग मोबाईलवर उपलब्ध झाल्यास मेट्रो आणि बेस्ट बसमधील प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोकलवर येणारा ताण आगामी काळात कमी झालेला दिसेल.