मुंबई- एप्रिल मे महिन्यांतील भयानक उन्हाच्या झळांना सामोरं गेल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते मान्सूनकडे. साधारणपणे मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तो भारतात पसरतो. यावेळचा मान्सून चांगला असेल असं भाकित हवामान खात्यानं आधीच वर्तवलं आहे. त्यामुळे आनंदी असलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
यावेळी मान्सून ४ दिवस आधी केरळला पोहचण्याची शक्यता आहे. म्हणजे मे महिन्याच्या २७ तारखेलाच मान्सून केरळच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देईल, असं सांगण्यात येतंय. असं घडलं तर हे १६ वर्षांत पहिल्यांदा घडणार आहे.

मान्सूनची लवकर धडक
यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळमध्येलवकर दाखल झाला होता. 2009 साली 23 मेलाच केरळच्या किनाऱ्यांवर मान्सून धडकला होता. 2024 साली म्हणजे गेल्या वर्षी मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यावर्षी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यास 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता आहे.
यंदाचा मान्सून चांगला
जून ते सप्टेंबर या काळात देशात सामान्यपेक्षा जास्त चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 महिन्यांत 105 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय. साधारणपणे 96 ते 104 टक्के पाऊस हा सामान्य असल्याचं सांगण्यात येतं. 104 ते 110 टक्के पाऊस हा सामान्यपेक्षा जास्त मानण्यात येतो. केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होणार असला तरी तो देशात लगेचच सक्रिय होईल असं नाही, असंही हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. लवकर येणारा मान्सून आणि देशात पडणारा पाऊस याचा एकमेकांशी काही संबंध नसल्याचंही सांगण्यात आलंय.
गेल्या पाच वर्षांत कसा पडला मान्सून
गेल्या वर्षी 2024 साली देशात 108 टक्के म्हणजे सामान्यपेक्षा चांगला पाऊस झाला होता. 2023 मध्ये 94 टक्के म्हणजे सामान्यपेक्षा कमी पाऊस देशात झाला होता. 2022 साली 106 टक्के म्हणजे सामान्यपेक्षा चांगला पाऊस भारतात झाला. हवामान विभागाच्या अंदाजापेक्षाही 2022 साली झालेला पाऊस हा जास्त होता.
अर्थव्यवस्थेसाठी चांगला मान्सून आवश्यक
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे चांगला मान्सून अत्यंत आवश्यक असल्याचं मानण्यात येतं. देशातील सुमारे 42 टक्के जनता ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं वर्ष आनंदात जातं. देशाच्या जीडीपीत कृषी विभागाचं 18.2 टक्के योगदान आहे. त्यामुळे पाऊस चांगला, शेती चांगली, उत्पादन चांगलं झालं तर महागाईचा धोका कमी होता. ऊर्जा निर्मितीसाठीही चांगला पाऊस पडणं गरजेचं असतं.