रविवारपासून मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत, बीकेसी ते वरळी फक्त 15 मिनिटांचा प्रवास, किती स्थानक, तिकीटांचे दर किती?

मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे.

Metro 3 : मुंबई रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र याच लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मेट्रो १ आणि २ ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मेट्रो 3 चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक अशी मेट्रो 3 (9.77 किमी) ची मार्गिका आहे. ही मार्गिक उद्यापासून (रविवार) पासून मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक प्रवासाचे साधन आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला.

मेट्रोला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद – मुख्यमंत्री

दरम्यान, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगांवसारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बीकेसी ते वरळी नाका किती स्थानकं? 

1. बीकेसी
2. धारावी
3. शितलादेवी मंदिर
4. दादर
5. सिद्धिविनायक मंदिर
6. वरळी
7. आचार्य अत्रे चौक (वरळी नाका)

तिकीटांचा दर किती? मेट्रो 3 दुसरा टप्पा कसा?

  • टप्पा 2 अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक
  • स्थानकांची संख्या – 6 (सर्व भूमिगत)
  • तिकिटाचे दर – किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 40 रुपये
  • गाड्यांची संख्या – 8
  • अंतर – 9.77 किमी
  • हेडवे – 6 मिनीट 20 सेकंद
  • प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) – 15  मिनिटे
  • फेऱ्यांची संख्या – 244 फेऱ्या
  • एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८
  •  एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) – ६७

About Author

Astha Sutar

Other Latest News