Corona virus in India :कोरोना विषाणू पुन्हा एकदा दहशत माजवू शकतो. गेल्या काही दिवसांत देशात कोविड-१९ चे अनेक रुग्ण आढळले आहेत. आता यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने एक अपडेट शेअर केले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, १९ मे पर्यंत देशात कोविडचे २५७ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. भारतासोबतच इतर देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
आशियामध्ये कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या रुग्णांपैकी बहुतांश केसेस JN.1 व्हेरिएंटचे आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात १२ मेपर्यंत एकूण १६४ रुग्ण नोंदवले गेले आहेत. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक ६९ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही कोविड-१९ चे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
देशात कुठे आणि किती कोरोना रुग्ण?
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये नोंदवले गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे, जिथे सध्या एकूण ६६ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, जिथे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५६ आहे, आणि यामध्ये ४४ नवीन रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र तमिळनाडूपेक्षा पुढे आहे.
कर्नाटकमध्ये ८ नवीन रुग्ण, गुजरातमध्ये ६ आणि दिल्लीमध्ये ३ रुग्ण नोंदवले गेले आहेत. हरियाणा, राजस्थान आणि सिक्किममध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, केरळमध्ये सध्या ९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भारतासह इतर देशांमध्येही कोविडचे पुनरागमन
आशियातील अनेक देशांमध्ये कोविडने पुन्हा एकदा दस्तक दिली आहे. नेशन थायलंडच्या माहितीनुसार, हाँगकाँगमध्ये ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ३१ रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर सिंगापूरमध्ये २७ एप्रिल ते ३ मे या आठवड्यात कोविड-१९ रुग्णांची अंदाजे संख्या १४,२०० इतकी होती, जी मागील आठवड्यातील आकडेवारीच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात ११,१०० रुग्ण नोंदवले गेले होते.
कोणत्या प्रकारचे कोरोना रुग्ण वाढले?
आग्नेय आशियातील कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे JN.1 प्रकार, जो ओमिक्रॉन BA.2.86 प्रकाराचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, JN.1 प्रकारात सुमारे 30 उत्परिवर्तने आहेत आणि त्यापैकी LF.7 आणि NB.1.8 आहेत, जे अलिकडेच नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये सर्वात सामान्य दोन वर्जन आहेत.