CM Devendra Fadnavis : जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य आहे. दरम्यान, हिंदू धर्म, संस्कृती आणि प्राचीन भागवत धर्मातील सनातन तसेच कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल, असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज (शनिवारी) आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
अध्यात्माशिवाय मनःशांती नाही…
प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटींचा आराखडा
दरम्यान, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल.
वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो…
वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. तसेच वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहत असतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.