Hybrid Fuel ST Buses : लालपरी म्हणजे एसटी ही ग्रामीण भागातील लोकांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. या एसटीबाबत एक क्रांतीकारक पाऊल परिवहन विभागानं उचललं आहे. एसटीच्या ताफ्यात हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या बसेस आणण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळं आगामी काळात पर्यावरणपूरक आणि प्रदूषण विरहित एसटीमध्ये बसेस दिसणार आहेत.
पुढील ५ वर्षात किती बसेस?
दरम्यान, ९० ठिकाणी एलएनजीचे पंप उभारण्यात येणार आहेत. तर महानगर गॅस प्रा. लि. कंपनीतर्फे सीएनजीचे २० पंप उभारले जाणार आहेत. यामुळं भविष्यात इंधनाची व्यवस्था आणि उपलब्धता आहे. तसंच हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्यांकडून मागविण्यात आला आहे. २०२५ साली ५ हजार गाड्या आणल्या आहेत. यातील २ हजार हायब्रीड बसेस रस्त्यावर धावताना दिसतील. तर पुढील ५ वर्षांत २५ हजार पर्यावरणपूरक बसेस आणणार आहे. तर ३ हजार बसेस संदर्भात निविदा काढल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

काय आहेत वैशिष्टये?
- हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या बसेस या पर्यावरणपूरक असतील
- या बसेसमुळं अजिबात प्रदूषण होणार नाही
- एसटी महामंडळ प्रत्येक वर्षी ५ हजार हायब्रीड बसेस आणणार
- या बसमध्ये इंधन म्हणून सीएनजी, एलएनजी किंवा इलेक्ट्रीक बॅटरीचा वापर
- हायब्रीड बसेसची कार्यक्षमता सामान्य बसेसच्या तुलनेत चांगली
- हायब्रीड बसेस या प्रति लीटर साडे पाच किलोमीटर अंतर कापते
- तर डिझेल इंधनावर बस मात्र प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते
- परिणामी इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार
- एलएनजी आणि सीएनजी इंधनामुळं प्रदुषण कमी होण्यास मदत होणार
- डिझेलच्या तुलनेने सीएनजी आणि एलएनजी दोन्ही इंधने स्वस्त
- दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत
- एलएनजी इंधन हे डिझेल इंधनाच्या किमतीच्या २० टक्के कमी दरानं पुरवठा करण्यात येणार