अहमदाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात घुसखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषत बांगलादेशी घुसखोरांचं भारतामध्ये मोठं प्रमाण आहे. दहशतवादी कारवायांमध्ये हे घुसखोर सहभागी होत असतात, त्याला खतपाणी घालत असतात. अवैधरित्या देशात राहणाऱ्या घुसखोरांवर कारवाई व्हावी, ही मागणी सातत्याने राहिली आहे. अशा परिस्थितीत आता गुजरातमध्ये बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अहमदाबाद सुरतमध्ये कारवाई
अहमदाबाद आणि सुरत येथे शनिवारी 26 एप्रिल रोजी एक मोठी कारवाई करण्यात आली. बांगलादेशी घुसखोरांविरोधात ही मोहीम राबवण्य़ात आली होती. यावेळी 1 हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व लोक अवैधरित्या या ठिकाणी राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती दिली. घुसखोरांविरोधात गुजरात पोलिसांनी केलेली आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

अहमदाबादमध्ये 890 तर सुरतमध्ये 134 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. घुसखोरांनी पोलिसांसमोर हजर व्हावे, अन्यथा त्यांना अटक करून हकालपट्टी करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
घुसखोरांना आश्रय नको
अवैधरीत्या भारतात आलेल्यांना आश्रय देणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही संघवी यांनी सांगितली आहे. याबाबत गुजरात पोलिसांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधून या घुसखोरांची बनावट कागदपत्रे मिळवून ते भारतात आले आहेत.त्यानंतर ते गुजरातमध्ये स्थायिक झाले.त्यातील काहीजण णंमली पदार्थ तसेच मानवी तस्करी करतात, काही लोक अल कायदाशी संबंधित स्लिपर सेलमध्ये देखील काम करतात. गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांनी स्थानिक युवकांची माथी भडकवण्याचे काम केले.