पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आपण कुरीयर बॉय असल्याची बतावणी करत नराधमाने तरूणीवर अत्याचार केले.
नेमकी घटना काय?
तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं होतं, मात्र तरूणीने ते आपलं नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरूणीने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला.

पोलिसांकडून तपास सुरू
घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे भान ठेवत गेट पार केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे.