पुणे – पुण्यात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात उच्चभ्रू सोसायटीत अकराव्या मजल्यावर जात 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
डिलिव्हरी बॉय म्हणून या तरुणानं बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. बँकेचं कुरियर असल्याचं सांगत त्यानं तरुणीच्या फ्लॅटची बेल वाजवली. कुरियर आपलं नसल्याचं तरुणीनं सांगतिलं. मात्र पार्सल तुमंमचं नाही याची पोचपावती देण्याचा आग्रह या तरुणानं केला. पेन नसल्याचा बहाणाही त्यानं केला.

घरात घुसून बलात्कार, नंतर काढला सेल्फी
डिलिव्हरी बॉयकडे पेन नसल्यानं लॅच उघडं ठेवून ही तरुणी पेन आणण्यासाठी आत गेली. इतक्यात आरोपीनं घरात प्रवेश केला. तरुणी घरात एकटी असल्यानं ती त्याला विरोध करु शकली नाही. तिच्या तोंडावर स्प्रे मारुन आरोपीनं तिला बेशुद्ध केलं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर या निर्ढावलेल्या आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये स्वताचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा मेसेजही टाईप करुन ठेवला.
घटनेनंतर खळबळ, मोठे पडसाद
तरुणी शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार सगळ्यांना समजला. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान विधानसभा अधिवेशनात या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.
सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र, अजित पवारांवरही टीका
पुण्यात घडलेल्या घटनेनं राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत, हे समोर आलं आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर पुण्यात अजित पवार यांचं वर्चस्व आहे, त्यांना दादा म्हणतात. पण दादांची भीती आता पुण्यात गुंडांना राहिली नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना लवकरात लवकर आरोपींला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तर सरकारनंही याची गंभीर दखल घेतल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय.