जयपूर : गुजरात विरूद्धच्या सामन्यात विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवणाऱ्या राजस्थाने मुंबई इंडियन्सच्या 218 चा टार्गेटपुढे सपशेल शरणागती पत्करली. अवघ्या 117 धावांमध्ये राजस्थानचा संघ ऑलआऊट झाला. जयपूर या आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थानला आता प्लेऑफसाठी पात्र ठरणे अवघड झाले आहे. तर, मुंबईने पाॅईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेत प्लेऑफसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 217 धावांचा डोंगर राजस्थानपुढे उभा केला होता. मुंबईच्या ओपनर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन याने जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 116 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर रिकेल्टन 61 रन्सवर आऊट झाला.

जसप्रित बुमराने दोन विकेट घेतल्या. तर ट्रेंड बोल्ड आणि स्पिनर करन शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. दीपक चहर याने एक तर कर्णधार पांड्या याने देखील एक विकेट घेतली.
रोहित शर्माच्या नावावर विक्रम
मुंबईकडून खेळताना सहा हजार धावा करणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू ठरला तर एकाच संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. रोहितने 36 बाॅल्समध्ये 53 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने या आपल्या खेळीत नऊ चौकार लगावले मात्र एकही सिक्स मारला नाही. रोहित आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 48 धावा करत मुंबईला 217 पर्यंत पोहोचवले.
राजस्थानचा डाव कोसळला
2018 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानला दीपक चहरच्या पहिल्याचा ओव्हरमध्ये झटका बसला. वैभव सूर्यवंशी हा शुन्यावर कॅचआऊट झाला. तर अवघ्या 13 धावांवर यशस्वी जशस्वाला बोल्टने आऊट केले. त्यानंतर राजस्थानचे ठराविक अंतराने विकट पडत राहिल्या. रियान पराग 16, ध्रुव जुरेल 11, हॅटमायर 0, शुभम दुबे 15 हे मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत.