Mumbai Municipal Corporation – पावसाळ्यात अनेक रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळं सध्या पालिकेकडून सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत.
तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. रस्ते कॉंक्रिटीकरण कामात निष्काळजीपणामुळं पालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित करण्यात आले आहे तर कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश…
३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. रस्त्यांची कामे सुरू असताना आणि कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्यावा, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
काँक्रिट (DLC) मिश्रणात गुणवत्तेचा अभाव
रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित काढून टाकून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काम करण्याचे निर्देश देखील कंत्राटदारास देण्यात आले आहेत. या अनुषंगाने, एच (पश्चिम) विभागात एका रस्ते कामात ‘सब बेस लेयर’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या ड्राय लीन काँक्रिट (DLC) मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळून आल्यावर संबंधित दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.