Aata Thampacha Nai – सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतील सुमारे १ हजारांहून अधिक कर्मचार्यांनी आज (दिनांक १ मे २०२५) प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहिला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या चित्रपटगृहांत हा चित्रपट चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
‘आता थांबायचं नाय’ हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रपट आज (दिनांक १ मे २०२५) प्रदर्शित झाला आहे. तर, हा चित्रपट पाहिल्यानंतर मी निःशब्द झालो आहे, अशी भावना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांचे आयुष्यच बदलून जाते
‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर उतरून स्वच्छता करीत असतात. मुंबई महानगर स्वच्छ–सुंदर ठेवण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते. पण कर्मचारी देखील रात्रंदिवस झटत असतात. मुंबईच्या या नायकांची स्वप्नं अचानक एक दिवस त्यांच्याकडे चालून येतात आणि या कर्मचाऱ्यांचे आयुष्यच बदलून जाते. हे सर्व घडते प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पुढाकाराने.
प्रेक्षकांचे डोळे पाणावले
सत्य घटनेवर आधारित असलेला कामगारांचा हा प्रेरणादायी प्रवास ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे जनतेसमोर सादर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांची धडपड, संघर्ष पाहून चित्रपटगृहातील प्रेक्षकांचे डोळे पाणावले. वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटाद्वारे करण्यात आले आहे. तसेच शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात बदल घडू शकतो, या सकारात्मक भावनेतून अनेक अडचणींवर मात करत रात्रशाळेत प्रवेश घेऊन हे कर्मचारी दहावीचे शिक्षण पूर्ण करून समाजासमोर आदर्श घालून देतात, त्याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.