पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झाले होते. मात्र, आता ही वाहतूक कोंडी दूर होणार आहे. कारण सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या 2 हजार 120 मीटर लांबीच्या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी उड्डानपूल उद्घाटन प्रसंगी दिले.

दीड लाख प्रवासांना थेट लाभ
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे पाच चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे. येथून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणार!
पुणे व पिंपरी चिंचवड शहर वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुण्याला मुळशी धरणाचे आणि पिंपरी चिंचवडला ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळावे असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम केले. ते देखील कमी पडत असल्यामुळे नवीन विमानतळाचे काम हाती घेतले आहे. काही नाराजी असली तरी जमीन घेतल्याशिवाय, पुनर्वसन केल्याशिवाय विकास होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवणार
पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी येरवड्यापासून नवीन बोगदा, ई – वाहने वाढण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन पर रक्कम देण्यासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातूनही शहरातील पर्यावरणाचा विचार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने सुविधा देणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिली.
मुला-मुलींकरता रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. टाटा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ३५० कोटी रुपयांचा प्रकल्प बाणेर येथे हाती घेतला आहे. यातून येथील मुला मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षण रत्नागिरी तसेच गडचिरोली येथे सुरू केले असून छत्रपती संभाजीनगर, बीड येथे सुरू करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:
- – सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने तीन टप्प्यात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाची निविदा 118 कोटी 37 लाख रुपयांची आहे.
– त्याअंतर्गत टप्पा 1 मध्ये राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा 520 मी लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. - – टप्पा २ मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा 2.2 कि. मी. लांब उड्डाणपूल आज खुला करण्यात आला तर टप्पा 3 च्या इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या १.५ कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- – टप्पा २ च्या पुलाचे काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी ७.३ मी असून एकूण पिलर ६० आहेत.