मुंबई : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची साथ देणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाला भगदाड पाडत एका माजी मंत्र्यासह तीन माजी आमदारांना आपला पक्षात घेत शरद पवारांना दे धक्का दिला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, तिलोत्तमाताई पाटील,जाहिदा मोदी पठाण, यशवंत पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

उत्तर महाराष्ट्रात भाजपला टक्कर
नंदुरबार, धूळे आणि जळगाव जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये नेते मंडळीची विभागणी झाल्याने दोन्ही राष्ट्रवादीची ताकद येथे कमी झाली होती. मात्र, आता शरद पवार यांच्या पक्षातील माजी मंत्री, तीन आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची ताकद वाढली आहे.स्थानिक निवडणुकीत भाजप टक्कर देईल, येवढी त्यांची ताकद वाढली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी पक्षात प्रवेश केलेल्या नवीन सहकाऱ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, राजकारणाबरोबरच आपापल्या भागातले प्रश्न सोडवण्याकरता आपण कार्यतत्पर राहायला हवं. सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी करायचा असतो, याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. विकास साधायचा असेल तर राज्यात आणि केंद्रात तुमच्या आमच्या विचारांचं सरकार असलं पाहिजे, हाच विचार करून आम्ही सत्तेत सामील झालो. आमचा हेतू इतकाच आहे की, राज्याला विकासाच्या बाबतीत गतिमान करणं.