ठाणे : नवी मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी ठाण्यातील आनंदआश्रम येथे एकनाथ शिदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याआधी नवी मुंबईतील 13 माजी नगरसेवक शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती थांबायचे नावच घेत नाही.
बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, शाखाप्रमुख अनुभव बेळे, शाखा संघटक जयश्री बेळे, विधानसभा संघटक सुनील सानप, विभाग अधिकारी विशाल गुंजाळ, शाखा अधिकारी अमित जाधव यांनीही एकनाथ शिंदेना साथ देत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.

शिंदेंची ताकद वाढली
शिवसेनेतील इन्कमिंगने एकनाथ शिंदेंची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आमच्यावर उठसुठ टीका करणाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
महापालिकेवर भगवा फडकवणार
गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदें यांनी व्यक्त केला. मुंबईत देखील शिंदेंनी ठाकरेंना घेरण्याचा प्लॅन केला आहे. आगामी काळात मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याचे संकेत शिंदें यांनी दिले.