महाबळेश्वर : नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने कोयना नदीपात्रात राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा, अभिनेते नाना पाटेकर हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नाना पाटेकर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावातील शेतात पोहोचले. तेते शेंद देखील उपस्थित होते.
नाना पाटेकर यांना शिंदेंनी शेतात फेरफटका मारून विविध पिकांची केलेली लागवड दाखवली. यावेळी शिंदे-पाटेकर यांनी मिळून अननसाचे झाडही लावले. तसेच शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी, चिकू, आंबे यांसारख्या विविध फळांचा मनसोक्त आस्वादही घेतला. दरम्यान, शेती आणि मातीशी नाळ जोडलेल्या नानांसोबत गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदे यांन दिली.

कोयना पात्रातील पाणी पातळी वाढली
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून कोयना धरणातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत असून त्यामुळे या धरणाची पाणी वहन करण्याची क्षमता वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात निदर्शनास आले आहे. नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनने केलेल्या कामामुळे कोकणाप्रमाणेच कोयना पात्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
महा-पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाबळेश्वर येथे आयोजित महा-पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. अशा महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनवाढीसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. या भागातील निसर्ग राखून इथे पर्यटन वाढ करणे शक्य होईल. तसे झाल्यास या भागातील स्थानिकांना याच भागातच रोजगार उपलब्ध होणार असून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.