मुंबई: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुती सरकार राज्यात अस्तित्वात आले, मोठं बहुमत मिळालं. मात्र कर्जमाफीचा मुद्दा गेल्या सहा महिन्यांत मागे पडला. मधल्या काळात शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक विधान केलं आहे, ज्यामुळे आता कर्जमाफी मिळेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
नेमकं काय म्हटले अजित पवार?
‘शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलंच नाही, नेमकं आश्वासन दिलं कोणी?’ असा प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांनाच विचारला. पत्रकारांनी शेतकरी कर्ज माफीचा प्रश्न अजितदादांना विचारला त्यावेळी त्यांनी कर्ज माफीचं आश्वासन कोणी दिलं असा उलट प्रश्न केला. तसंच मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही, असंही दादांनी यावेळी म्हंटलं.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात निवडून आल्यावर 100 टक्के शेतकरी कर्ज माफीची घोषणा केली होती. मात्र सत्ता स्थापन झाल्यावर पुढचे 2 वर्ष कर्ज माफी मिळणार नसल्याचं महायुतीने स्पष्ट केलं. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला, त्यावेळी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन कोणी दिलं? असा उलट प्रश्न अजित पवारांनीच पत्रकारांना केला.
कर्जमाफी मिळणार की नाही?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता महायुती सरकार आणि सरकारमधील प्रमुख नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ठिकठिकाणी पत्रकार आणि सामान्य जनतेकडून उपस्थित केलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नाला उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पुढील 2 वर्षानंतर शेतकरी कर्जमाफीचा विचार करू असं आश्वासन कृषिमंत्री बाबासाहेब कोकाटेंनी दिलं होतं.