Mahabaleshwar Mahaparyatan Festival : महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरकडे पाहिले जाते. महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल. तसेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

कमी दिवसात महोत्सवाची उत्तम तयारी…
महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विवविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे.
पर्यटनाला खूप वाव…
पर्यावरणाचा ऱ्हास व तपापमान वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी किफायतशिर ठरणाऱ्या बांबु लागवडीला चालना दिली पाहिजे. महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, त्यांना सुरक्षीत वातवरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत आहे. प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करुन या उपक्रमाबद्दल एकनाथ शिंदेंनी मंत्री देसाई यांचे कौतुक केले.
आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे यासाठी काम करा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.