राज्यात एकीकडे तापमान 43 अंशांच्या घरात पोहोचलेले असताना आता हवामान विभागाकडून पावसाबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांना उष्णतेपासून आणि पाणी टंचाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नेमका हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…
कोणत्या जिल्ह्यांत पाऊस बरसणार?
भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 03 मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पाऊस, दिलासा मिळणार?
विदर्भ ते दक्षिण भारतातील केरळ या पट्ट्यात हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे परिणामी हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे.
तापमान वाढल्याने नागरिक हैराण
हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरण ढगाळ आहे. त्यामध्ये उष्णता देखील मोठी आहे. या दमट वातावरण तयार होऊन उकाडा असह्य झाल्याचे चित्र सर्वदूर आहे. तापमान 43 अंशांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत पाऊस कोसळल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या भागात पाणीटंचाई जाणवत आहे, तेथील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.