मुंबईत आयोजित केलेल्या Waves 2025 म्हणजेच ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ परिषदेत गुरुवारपासून कार्यक्रमांची मांदियाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटक करण्यात आलं. या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शवली असून राजकीय नेत्यांपासून कला क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित आहेत. रविवारपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ हजार कोटींचे विविध सामंजस्य करार केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.
जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेज कडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एनएसई इंडायसेसकडून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ
‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने मुंबईत आयोजित व्हेव्ज 2025 या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्समध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत. भारताच्या सर्वात गतिशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हज्’च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे, असा विश्वास एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी ‘सिडको’चा करार
सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.