कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावरील वक्तव्याची उच्च न्यायालयाने घेतली दखल, मंत्री विजय शाह यांच्यावर FIR दाखल होणार

हायकोर्टाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत ती याचिकेच्या स्वरूपात ऐकली आणि त्यांच्याविरोधात ४ तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

Vijay Shah On Col Sofia Qureshi : मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानावर आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मंत्री यापूर्वीच या प्रकरणाबाबत माफी मागितली आहे.

नेमकं काय विधान काय होतं?

मध्य प्रदेशच्या, मोहन यादव सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी मानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानाला काँग्रेसने तीव्र विरोध केला असून मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. मानपूरमध्ये झालेल्या हलमा कार्यक्रमात मंत्री शाह यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले होते, की “ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये लोकांची हत्या केली, त्यांच्या अंगावरील कपडे उतरवले, त्या अतिरेक्यांनी आपल्या बहिणींचं सिंदूर पुसून टाकले.”

यावर मंत्री शाह यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच अतिरेक्यांच्या बहिणीला पाठवून त्यांची योग्य जागा दाखवून दिली. या विधानावरून जेव्हा राजकारण तापले, तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आपल्या बहिणींचे सिंदूर पुसणाऱ्यांना आपण त्यांच्या भाषेतच उत्तर दिले आहे.” त्यांच्या भाषणाचा अर्थ वेगळ्या संदर्भात घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या आपल्या बहिणी आहेत. त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी लष्करासोबत काम केलं आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले.

कोर्टाने काय सांगितले

हायकोर्टाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत ती याचिकेच्या स्वरूपात ऐकली आणि त्यांच्याविरोधात ४ तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. खंडपीठाने पोलीस विभागाला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

खंडपीठाने मंत्र्यांविरोधात बीएनएसच्या कलम १९६ आणि १९७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत राज्याचे पोलिस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एफआयआर नोंदवण्यात आल्यास न्यायालयाला त्याची माहिती दिली जावी. या याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News