Kaifi acid attack survivor from Chandigarh : चंडीगडच्या १७ वर्षीय कैफ़ी हिने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एक असामान्य यश प्राप्त केले आहे. लहान वयातच अॅसिड हल्ल्याची शिकार झालेली आणि दृष्टिबाधित असलेल्या कैफ़ीने CBSC १२वी बोर्ड परीक्षेत ९५.६% गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे स्वप्न आहे, आयएएस अधिकारी बनण्याचे आहे.
शिक्षकांनी आणि पालकांनी आधार दिला
कैफ़ीने सांगितले, की ‘मी हरियाणाच्या हिसारची रहिवासी आहे. १२वीमध्ये ९५.६% गुण मिळवले आहेत, आणि १०वीतही मी ९५.२% गुण मिळवले होते. मी अॅसिड अटॅक सर्वायव्हर आहे, तसेच दृष्टिबाधितही आहे. त्यामुळे माझ्यासमोर अनेक अडचणी होत्या, पण माझे पालक आणि शिक्षकांनी मला खूप आधार दिला.’

कैफीच्या अभ्यासाचे मुख्य माध्यम ऑडिओ आणि पाठ्यपुस्तकं होती. अशा परिस्थितीतही कैफ़ीने हार न मानता कठोर परिश्रम करत आपले ध्येय स्पष्ट ठेवले. तिला आयएएस अधिकारी बनयाचे आहे.
देशभरातून कैफीचे कौतुक
या यशामुळे कैफ़ीने समाजाला एक मजबूत संदेश दिला आहे. जर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर शारीरिक मर्यादा किंवा संकटं तुमच्या स्वप्नांना अडवू शकत नाहीत. कैफीच्या या प्रेरणादायी यशाबद्दल देशभरातून तिचे कौतुक होत आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी तिच्या धाडसाचं आणि समर्पणाचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, कैफी केवळ तीन वर्षांची असताना हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुढाणा गावात तिन्ही शेजाऱ्यांनी तिच्यावर अॅसिड फेकले होते, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि हातांवर गंभीर भाजले गेले आणि तिची दृष्टी कायमची गेली.