मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात Apple या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मात्र आता या नावासोबत आणखी एक नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे सबीह खान. त्यांची नेमणूक जगातील सर्वात मूल्यवान टेक कंपनी Apple च्या नवीन COO (Chief Operating Officer) म्हणून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सबीह खान यांचा भारताशीही खास संबंध आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात झाला होता. आज ते अशा उंचीवर पोहोचले आहेत जिथे पोहोचण्याचं स्वप्न कोट्यवधी लोक पाहतात.
कोण आहेत सबीह खान?
सबीह खान 1995 पासून Apple सोबत जोडले गेले आहेत. म्हणजेच गेली सुमारे 30 वर्षे ते या कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यांनी कंपनीच्या ऑपरेशन्स आणि प्रॉडक्शन सिस्टिम्सचे व्यवस्थापन इतकं उत्कृष्ट पद्धतीने केलं आहे की, Apple चे CEO टिम कुक देखील त्यांच्या कामाचे कौतुक करतात. आता त्यांना कंपनीचा नवीन ऑपरेशन्स हेड म्हणजेच COO – म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिक्षण
सबीह खान यांनी अमेरिका येथील तुलाने युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर एमबीए पदवी प्राप्त केली आहे. मात्र त्यांचे शालेय शिक्षण भारतातच झाले होते. भारताच्या एका सामान्य शहरातून बाहेर पडून अमेरिकेच्या कॉर्पोरेट जगतात स्वतःची ओळख निर्माण करणे सहज शक्य नव्हते, पण सबीह खान यांनी हे शक्य करून दाखवले.
कमाई किती?
Barron’s च्या रिपोर्टनुसार, सबीह खान यांच्यापूर्वी Apple चे COO असलेले जेफ विलियम्स यांना बेस सॅलरी म्हणून 1 मिलियन डॉलर (अंदाजे ₹8 कोटी) मिळत होती. बोनस आणि इतर सुविधांचा समावेश केल्यास त्यांची एकूण कमाई 23 मिलियन डॉलर (अंदाजे ₹191 कोटी) पर्यंत पोहोचत होती. अशीच अपेक्षा आहे की सबीह खान यांची कमाई देखील या पातळीवर असू शकते. मात्र, Apple कडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही