इस्लामाबाद– पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा अस्थिरता निर्माण झाली आहे. राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांना लवकरच पद सोडण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं, अशी जोरदार चर्चा सध्या इस्लामाबादच्या राजकीय वर्तुळात सुरुये. त्यांच्या जागी पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे देशाचे नवे राष्ट्रपती होतील अशी शक्यता आहे.
या बदलानंतर देशातील संसदीय प्रणाली बदलून राष्ट्रपती प्राणाली लागू करण्याची तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. पाकिस्तानातील सत्ता परिवर्तानाचा हा खेळ पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्यानं होतोय.

असीम मुनीर नवे राष्ट्रपती?
पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर हे सध्या पाकिस्तानातील सत्तेच्या रचनेत सर्वोच्च स्थानी आहेत. सत्तेवर त्यांची पकड आणखी मजबूत होत असल्याचं दिसतंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतरही त्यांना फिल्ड मार्शल पद देऊन त्यांची पदोन्नती करण्यात आलीय. या पदामुळे मुनीर यांना आजीवन सैन्य विशेषाधिकार, कायद्यातून संरक्षण आणि घटनाबाह्य हस्तक्षेपांपासून संरक्षण मिळालंय.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा मात्र विरोध
लष्कर प्रमुख मुनीर आणि जरदारी यांच्यातील समीकरणांवर पंतप्रधान शहबाज शरीफ नाराज आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पार्टी असलेल्या पाकिस्तानी मुस्लीम लीग नवाजनं या नव्या घडामोडींना विरोध सुरु केलाय.
राष्ट्रपती प्राणाली लागू झाली तर सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. असं घडल्यास पाकिस्तानच्या राजकारणात शरीफ कुटुंबाचं स्थान डळमळीत होण्याची शक्यता आहे. बिलावल भुट्टो हे नवे पंतप्रधान होणार असल्याचीही चर्चा आहे. शरीफ यांची पार्टी बिलावल पंतप्रधान होऊ नये यासाठी सैन्यदलातील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून प्रयत्नशील असल्याचंही सांगण्यात येतंय.
बिलावल यांना पंतप्रधान करण्याची मागणी
पाकिस्तानी पीपुल्स पार्टी म्हणजेच पीपीपीचे नेते आसीफ अली जरदारी यांच्या राजीनाम्याची चर्चा त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे होतेय. बिलावल भुट्टो यांना मोठं पद मिळालं तर राजीनामा देऊ, अशी अट जरदारी यांनी ठेवल्याचं सांगण्यात येतंय.
पीपीपीनं बिलावल भुट्टो यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. मात्र पक्षातच त्यांच्या नावाला विरोधही होतोय.
मुनीर घटनेत संशोधन करण्याची शक्यता
सैन्यदल प्रमुख मुनीर यांचा प्रभाव पाकिस्तानी संसद, न्यायपालिका आणि परराष्ट्र व्यवहार धोरणांवर दिसू लागला आहे. वटशिंग्टन, रियाद आणि विजिंगमध्ये त्यांनी केलेल्या दौऱ्यांनंतर आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा चेहरा होऊ पाहतायेत.
मुनीर राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना केवळ प्रतिकात्मक पद नको आहे तर संपूर्ण राजकीय व्यवस्थाच बदलण्याचा त्यांचा मानस असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायेत. सद्यस्थितीत संसद, न्यायपालिका आणि माध्यमांवर मुनीर यांचं पूर्ण नियंत्रण असल्याचं मानण्यात येतय. अशा स्थितीत देशात राष्ट्रपती प्रणाली लागू करणं त्यांना अवघड नसेल असं सांगण्यात येतंय.