मुंबई – अभिनेत्री आलिया भट्टची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात आलियाची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकानं आलियाची 77 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
वेदिकानं दोन वर्ष आलियाच्या पर्सनल आणि प्रोडक्शन हाऊसच्या अकाऊंटमधून लाखो रुपये लुटल्याची माहिती आहे. गेल्या पाच महिन्यांपासून वेदिकाचा शोध घेण्यात येत होता, अखेरीस तिला बंगळुरुत अटक करण्यात आलीय. वेदिकाला अटक केल्यानंतर तिला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

कशी केली आलियाची फसवणूक?
अटक करण्यात आलेली वेदिका शेट्टी ही 32 वर्षांची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती आलियासाठी पर्सनल मॅनेजर म्हणून काम करत होती. मे 2022 ते ऑगस्ट 2024 या काळात वेदिकानं आलियाच्या पर्सनल आमि प्रोडक्शन हाऊस इटरनल सनशाईनच्या खात्यांतून पैसे चोरल्याचा आरोप आहे.
आलियाची आई सोनी राजदान यांनी वेदिकाच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर वेदिकाचा शोध घेण्यात येत होता.
बनावट कागदपत्रांवर घेतल्या सह्या
आलियासोबत काम करताना वेदिकाला आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यास सांगितलं होतं. या काळात वेदिकानं बनावट कागदपत्रांवर आलियाच्या सह्या घेतल्याची माहिती आहे. वेदिका ट्रॅव्हल, मीटिंग आणि इव्हेंटशी संबंधित खोटे इनव्हॉईस तयार करत होती. त्यासाठी ऑनलाईन इमेजिंग अॅपचा वापर ती करीत होती. या पैशांच्या व्यवहारात वैदिकाच्या काही मित्रांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय.
वेदिका प्रकाश मुंबईच्या एनजी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत राहते. 2024 साली आलियानं तिला पदावरुन हटवलं होतं. आलियाच्या आधी अनेक अभिनेत्यांकडे पर्सनल मॅनेजर म्हणून वेदिकानं काम केलेलं आहे