Gujarat Bridge Collapse : बडोद्यात भीषण दुर्घटना, अचानक कोसळला पूल; धावत्या गाड्या थेट नदीत, 10 प्रवाशांचा मृत्यू

४५ वर्षांपूर्वीचा हा पूल अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. पुलावरुन जात असलेले दोन ट्रक आणि एक बोलेरोसह चार वाहनं नदीत पडली.

बडोदा – मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडणारा महिसागर नदीवरील जुना पूल मंगळवारी अचानक तुटला. ४५ वर्षांपूर्वीचा हा पूल अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. पुलावरुन जात असलेले दोन ट्रक आणि एक बोलेरोसह चार वाहनं नदीत पडली.

या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून 8 जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवलंय. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं बचावकार्य सुरू केलं असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पूल तुटल्याचा मोठा परिणाम

हा पूल कोसळल्यानं दक्षिण गुजरातच्या पर्यटन आणि परिवहन व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. हा पूल भरुच, सूरत, नवसारी, तापी आणि वलसाडला सौराष्ट्राशी जोडत होता. हा पूल तुटल्यामुळे आता दक्षिण गुजरातच्या नागरिकांना सौराष्ट्रात पोहचण्यासाठी दूरचा वळसा पडणार आहे. यासाठी जास्त वेळ लागणार आहे.

दुर्घटनेत आठ जणं जखमी

या दुर्घटनेत आठ जणं जखमी झाले आहेत. यातील सहा जणांना पादरा रुग्णालयात तर दोघांना बडोद्याच्या सयाजी हटस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच या पुलाजवळ बघ्यांची मोठी गर्दी उसळली.

दुर्घटनेला प्रशासन जबाबदार- स्थानिक

स्थानिकांमध्ये या दुर्घटनेनंतर संतापाची भावना आहे. ४५ वर्ष जुन्या पुलाची डागडुजी करावी अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आली होती, मात्र प्रशासनानं त्याकडं दुर्लक्ष केलं, असा आरोप स्थानिकांनी केलाय. या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News