Shivsena – सध्या राज्यात मराठी-अमराठी आणि हिंदी भाषावरुन वाद सुरु आहे. मराठीवरुन मनसेनं काल मिरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला आहे. मुंबईत शिक्षण घेतलेल्या मात्र मराठीचा ‘म’ देखील बोलू न शकणाऱ्या उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेना महिला आघाडीने मराठी शिकण्यासाठी इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक भेट म्हणून पाठवले आहे.
… मग मराठीचा कैवारी व्हावे
दरम्यान, आधी उबाठाने खासदारांना, आमदारांना आणि नेत्यांना मराठी शिकवावे आणि मग मराठीचा कैवार आलेला आहे हे दाखवावे, अशी घणाघाती टीका शिवेसना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उबाठावर केली. चतुर्वेदी यांनी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून मराठीचे धडे गिरवावेत आणि मराठी बोलायला शिकावे, असा टोला म्हात्रे यांनी यावेळी लगावला. प्रियंका चतुर्वेदी यांनी एका मुलाखतीत मराठी कच्चे आहे, बोलता येत नाही, असे म्हटले होते. त्यावर शिवसेना महिला आघाडीने चतुर्वेदी यांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

चतुर्वेदींवर कारवाईची धमक दाखवतील का?
पुढे बोलताना शितल म्हात्रे म्हणाल्या की, पाच वर्षांपासून खासदार असलेल्या चतुर्वेदींना मराठी शिकायला वेळ मिळाला नाही का? असा खरमरीत सवाल शीतल म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘म’ मराठीचा म्हणून मोर्चा काढणारे, ‘म’ महाराष्ट्राचा म्हणून बोलणारे उबाठाचे नेते चतुर्वेदी यांच्या कमकुवत मराठीवर कारवाई करण्याची धमक दाखवतील का, असे म्हात्रे म्हणाल्या. तसेच चतुर्वेदी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. ३० ते ३५ वर्ष मुंबईत राहून देखील त्यांना मराठी बोलता येत नाही का? असा सवाल म्हात्रेंनी उपस्थित केला.