उत्तराखंडमधील केदारनाथ धाम हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. भाविक दरवर्षी चारधाम यात्रा करत असतात. दरवर्षीप्रमाणे, यंदाही केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यातील सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाविकांसाठी उघडले जात आहेत. या वर्षी, केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता उघडले जातील, अशी माहिती श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल यांनी दिली आहे.
सकाळी 7.00 वाजता उडणार दरवाजे
02 मे रोजी म्हणजेच उद्या सकाळी ठिक 7.00 वाजता हे दरवाजे उघडले जाणार आहेत. दर्शनासाठीची नोंदणी गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली होती. दुसरीकडे काही प्रमाणात नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी संभवू शकतो, त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे भाविकांना चिंता न करण्याचं आवाहन केलं जात आहे. काही भाविक उत्तराखंडमध्ये आधीच दाखल झाले आहेत.

चारधाम यात्रेबद्दल थोडक्यात
चारधाम यात्रा म्हणजेच केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेणे. या यात्रेला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि शास्त्रानुसार, या चारही धामांच्या दर्शनाने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य आहे. उत्तराखंड सरकारने यंदा चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सुरू केली आहे. केदारनाथ धामसाठी प्रति दिवशी 15,000 भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली गेली आहे . भाविकांनी केदारनाथ धामच्या दर्शनासाठी नोंदणी करून, या पवित्र यात्रेचा आनंद घ्यावा.
कसा असतो दरवाजे उघडण्याचा सोहळा?
ओंकारेश्वर मंदिरात पंचांग पाहून शुभ मुहूर्त निश्चित केला जातो. यानंतर, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली जाते. या दिवशी, उखीमठ येथून भगवान केदारनाथची पंचमुखी मूर्ती डोलीमध्ये उचलून केदारनाथ मंदिरात नेली जाते. या डोली यात्रेला ‘डोली यात्रा’ असे म्हणतात. मूर्ती मंदिरात पोहोचल्यावर, पुजारी विविध वेद मंत्रोच्चारांसह पूजा करतात. यानंतर, मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात.