नागपूर: भारत – पाक युध्दजन्य परिस्थितीमुळे राजधानी दिल्लीचा धोका वाढल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत नागपूर शहराला देशाची आपत्कालीन परिस्थितीतील पर्यायी राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. दिल्ली शहराला युध्दामुळे मोठा धोका संभवतो, असं त्यांनी म्हटलं. मुत्तेमवारांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
नागपूर पर्यायी राजधानी करा -मुत्तेमवार
भारत – पाक वाद सध्या तुर्तास निवळताना दिसत असला तरी आगामी काळात वातावरण बिघडू शकते. हा वाद आता अधिक टोकाला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती बघता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच आता माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करण्याची मागणी केली आहे. दिल्लीवर हल्ल्याची शक्यता लक्षात घेता या पर्यायाची निवड करावी, असं त्यांनी सुचविलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे. तरी पाकच्या कुरापती सुरूच आहेत.
नागपूरचं भौगोलिक महत्व मोठं
नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून, पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणारे शहर आहे. शिवाय परराष्ट्रांच्या सीमारेषांपासून हे शहर दूर आहे. या सर्व गोष्टी पाहता नागपूरला देशाची राजधानी करावी, ही मागणी तशी जुनी आहे. ‘2001 आणि 2013 मध्ये मी संसदेत ही मागणी केली आणि नंतर एक महिन्यातच संसदेवर हल्ला झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ही मागणी करत आम्ही सांगितलं होतं. अशातच देशाच्या मध्यस्थानी असेलेल नागपूर संभाव्य परिस्थिती बघता आणि आपत्कालीन पर्यायी म्हणून देशाची राजधानी करावी’ असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेवारांनी केलं आहे.
स्वातंत्र्यापासून मागणी सुरू
नागपूरला देशाची राजधानी करण्याची मागणी स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळापासून सुरू आहे. देशाच्या भौगोलिक मध्यभागी असलेले नागपूर हे प्रशासनासाठी अधिक सुलभ ठरेल, असा युक्तिवाद करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारधारेत नागपूरचे विशेष महत्त्व होते. विदर्भातील काही नेते व संघटना वेळोवेळी नागपूर राजधानी व्हावी यासाठी आंदोलन करत आल्या आहेत. दिल्लीवरील लोकसंख्या आणि दडपण कमी करण्यासाठीही नागपूरची चर्चा होते. तथापि, राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे ही मागणी अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. तरीही, नागपूरला ‘उपराजधानी’चा दर्जा मिळालेला आहे, हे महत्त्वाचे मानले जाते.