मालवण – २०२४ साली मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या जागी त्याहून भव्य पुतळा विराजमान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले राजकोट, सिंधुदुर्गमध्ये जाऊन शिवरायांच्या या पुतळ्याचं पूजन केलं. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, नितेश राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन आणि आरती करण्यात आली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान असल्याचं मुख्यमंत्री यावेळी त्यांच्या भाषणात म्हणाले. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु असा निर्धार केला होता. त्यानुसार या पुतळ्याचं आज पूजन केलं, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कौतुकही केलं.

वादळातही उभा राहील असा पुतळा- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे. किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राजकोट किल्ल्याचा होणार विकास
राजकोट किल्ला परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. अशी माहिती यावेळी फडणवीसांनी दिलीय. येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.