मुंबई – जागतिक घडामोडींमुळे जागतिक मंदीची चर्चा सुरू असताना जगभरातील बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या चढउताराचा फटका बाजारातील गुंतवणुकदारांना बसतोय. अनेक गुंतवणुकदारांचे पोर्ट फोलिओ तोट्यात गेले आहेत. या सगळ्यात म्युचअल फंडांत गुंतवणूक असणाऱ्यांना मात्र चांगले रिटर्न्स मिळाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या एका वर्षांत ब्ल्यू चिप म्युचअल फंडानं 16 टक्के रिटर्न दिले आहेत.
एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना ब्लू चिपसारख्या म्युचअल फंडांतून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. या सगळ्यात ब्ल्यू चीप म्युचअल फंड काय आहे हे जाणून घेऊयात.

ब्लूचिप फंड काय आहे ?
ब्लयू चिप हा लार्ज कॅप म्युचअल फंड आहे. यासह काही लार्ज कॅप म्युचअल फंडासोबतही ब्ल्यू चिपचं नाव जोडलं जातं. यात AXIS, ICICI, CBI, कोटक ब्ल्यू चिप, कोटक आणि फ्रँकलिन यांचा समावेश आहे.
ब्ल्यूचिप म्युचअल फंडांकडून गुंतवणुकदारांकडून गोळा केलेली रक्कमेतील कमीत कमी ८० टक्के रक्कम ही टॉप १०० कंपन्यांमध्ये गुंतवते. या टॉप कंपन्यांचे शेअर्स बाजारात साधारण स्थिर असतात. त्यामुळे यात पैशांची गुंतवणूक दीर्घकाळासाठी करणे कमी धोकादायक असल्याचं सांगण्यात येतं.
ब्ल्यू चिप फंडाबाबत 3 महत्त्वाच्या बाबी
१. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडसच्या तुलनेत हे म्युचअल फंड जास्त स्थिर असतात. शेअर बाजारात चढ उतार आले तरी यांना फार फटका बसत नाही
२. या फंडांतून मोठ्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाते, त्यामुळे जोखीम कमी असते.
३. ब्ल्यूचिप म्युचअल फँडातील किमान ८० टक्के गुंतवणूक ही टॉप १०० कंपन्यांतच केली जाते.
कमी जोखमीत जास्त रिटर्न्सची हमी
ज्या कंपन्यांचा आकार मोठा असतो आणि ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते अशा कंपन्यांना ब्लूचिप कंपन्या म्हणून संबोधलं जातं. अशा कंपन्यांचे शेअर्स घसरण्याची शक्यता कमी असते. दीर्घकालासाठी अशा कंपन्यांतील गुंतवणूक फायदेशीरच ठरते. ३ ते ५ वर्षांचा विचार करुन अशा कंपन्यांत केलेली गुंतवणूक ही फायदेशीरच ठरते.
विशेष म्हणजे यात लॉक इन पिरियड नसतो. त्यामुळे गुंतवणूकदार हवे तेव्हा पैसे फंडातून काढूही शकतो. छोट्या काळासाठी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा अधिक जोखमीची मानली जाते.
(या बातमीत केवळ सूचना देण्यात आलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.)